अरेंज मॅरेज - अनोळखी पासून जिवलगा पर्यंत ( भाग - 7 )
दुसऱ्या दिवशी दोघांचं ऑफिसला जाण्याच्या घाईत बोलणंच झालं नाही. नात्यात संवादाचं वेगळंच महत्व असतं. आपल्या समोरच्याप्रती असलेल्या भावना, आदर, प्रेम व्यक्त करणं असो की गैरसमज दूर करणं असो. या सर्वांमध्ये संवाद महत्वाची भूमिका बजावतात. संवादांचा दुष्काळ नात्याचा वाळवंट करून टाकतो.
ऑफिस मधेही प्रांजलीच्या डोक्यात विचारचक्र वेगाने फिरत होतं. विचारांची गुंतागुंत तिच्याकडून सुटता सुटत नव्हती. एकीकडे होता तिचा आत्मसन्मान. एक मिनिट. आत्मसन्मान की इगो? तेही तिला कळेना. दुसरीकडे होतं त्यांचं नातं. नातं सात जन्माचं. नातं लग्नरूपी रेशमाने बांधलं गेलेलं. नातं पतीपत्नीचं. नातं दोन जीवांना एक करणारं. पतीपत्नीमध्ये तुझंमाझं पेक्षा आपलं याला जास्त महत्व.
तिचं एक मन म्हणायचं, "पतीपत्नीच्या नात्यात दोघांना सारखं महत्व असावं ना. त्याची जॉब, त्याची इच्छा. तितकंच माझी जॉब व माझी इच्छा याला पण महत्व आहेच. तो चुकीचंच वागला. विचारणं आणि सांगणं नाही नाही आज्ञा देणं, यात किती फरक असतो! त्याने मला विचारणं, निदान चर्चा करणं तरी अपेक्षित होतं. नात्यात आपल्या अगोदर आपण समोरच्याचा विचार करायला हवा ना!"
दुसरं मन म्हणायचं, "मला तो जायचं म्हणतोय त्या शहरात देखील जॉब मिळू शकते. मंग काय फरक पडतो? त्याचं म्हणणं बरोबरच आहे. तसंही तो म्हणाला होता की जावं लागले. जायचं आहे, असं तर नव्हता ना म्हणाला! मीच उगाच त्याला वाईट समजतेय का? जरी मी हट्ट करत बसले आणि त्याने आमचं नातं हरलं तर! माझ्या जिंकण्याला काही अर्थ राहिल का? पतिपत्नीमध्ये कसलं आलं हरणं आणि जिंकणं? नाही मी शांत रहायला हवं."
तिला कळतच नव्हतं की काय प्रतिक्रिया द्याव्यात. काय सांगावं त्याला? त्याच्याशी भांडावं का? की चुपचाप तो जसं म्हणेल तसं करावं? किती गुंतागुंत होती तिच्या मनात!
तिला वाटलं की फोन करून बोलून घेऊ एकदा. पण फोन वर नीट बोलणं होईल का? नको महत्वाची गोष्ट आहे. निवांत बोललेलंच बरं. उगाच घाईत विषय वाढायला नको. नंतर ती कामात व्यस्त झाली.
संध्याकाळी ती घरी पोहोचली. कमलाताईंनी स्वयंपाक वगैरे बनवलेला होता. फोडणीचा सुगंध घरामध्ये पसरला होता. ती फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसली होती. ती गगन येण्याची वाट बघू लागली. थोडया वेळाने कमलाताई तेथे आली.
ती म्हणाली, "ताई मी स्वयंपाक बनवून ठेवला आहे. बाकीची कामं पण झाली आहेत. तुम्ही आणि साहेब जेवून घ्या."
प्रांजली म्हणाली, "हो. ठीक आहे."
ती म्हणाली, "बरं. येते मी."
प्रांजली म्हणाली, "बरं. ठीक आहे. या."
ती निघून गेली. प्रांजली गगनची वाट बघू लागली. आज खूपच उशीर झाला होता. तिने दोन-तीन वेळेस कॉल करून बघितला ; पण त्याने फोन उचलला नाही. ती पण जेवली नाही. खूप वेळाने तो आला. नंतर तो फ्रेश झाला. तिने दोघांसाठी जेवण वाढले. जेवण झाल्यावर दोघे हॉलमध्ये बसले होते.
तिने विचारलं, "आज इतका उशीर का झाला?"
तो म्हणाला, "मिटिंग होती त्यामुळे."
ती म्हणाली, "हो पण बाहेर आल्यावर तरी परत कॉल करायचा ना!"
तो म्हणाला, "बघितलं नाही. झोप बरं आता. उद्या बोलूत. अगोदरच खूप डोकं खराब झालं आहे."
तिला आता राग आला होता.
ती म्हणाली, "म्हणजे माझ्यामुळे डोकं खराब होतं का?"
तो म्हणाला, "अगं मी तसं कुठं म्हणालो. बोलू ना आपण सकाळी."
ती म्हणाली, "का आता काय प्रॉब्लेम आहे? मी पण जॉब करते. मला पण कामाचा तणाव असतो. तुझीच प्रॉब्लेम मोठी असते का नेहमी? माझी पगार कमी आहे म्हणजे माझ्या जॉब ला काहीच महत्व नाही का? मला काहीच काम नसतं का? म्हणून मी जॉब सोडून द्यायची का तुझ्या प्रमोशन साठी?"
तो म्हणाला, "मी कुठं काय म्हणालो? तुझी इच्छा नसेल तर राहूत आपण इथेच. दोघे मिळून निर्णय घेऊत ना आपण. मी कुठं सक्ती करतोय?"
ती म्हणाली, "त्याबद्दलच तर बोलायचं होतं. पण तू ऐकशील तेव्हा ना! तू सारखं अव्हॉइड करतोय मला."
ती रागात झोपी गेली. त्याने बोलण्याचा प्रयत्न केला पण तिने ऐकलं नाही. तिला थोडीशी भीती वाटू लागली. जास्त तर बोलून नव्हती गेली ना ती रागाच्या भरात? इकडे गगनला पण वाईट वाटले. त्याने तिच्याशी बोलून लवकर प्रश्न सोडवायला हवा होता. तसंतर त्याची चूक नव्हती ; पण त्याचा परिणाम तर दोघांच्या नात्यावर होत होता. त्यामुळेच तिला असं वाटू लागलं असेल की तिला त्यांच्या नात्यात महत्व नाही. म्हणूनच तिला राग आला असावा. तोही झोपी गेला.
पुढील भाग लवकरच.
आवडल्यास share नक्की करा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा