अरेंज मॅरेज - अनोळखी पासून जिवलगा पर्यंत ( अंतिम भाग )

Arranged Marriage


दुसऱ्या दिवशी तो लवकरच कामावर निघून गेला. प्रांजलीचं डोकं शांत झालं होतं. ती थोडी चिंतेत होती. काल रागात ती जास्त तर बोलून गेली नव्हती ना? हा प्रश्न तिला सतावत होता. तिला वाटू लागलं की ती उगाच जास्तीचं बोलून गेली. तसंही तिला दुसऱ्या शहरात सुद्धा सहजासहजी जॉब मिळालाच असता! कशाला उगाच नात्यात दुरावा! विचार चालू असतांनाच तिची नजर घड्याळावर पडली. तिलाही ऑफिसला जायचे होते. ती तयारीला लागली.


कमलाताईंनी गरम-गरम पोहे टेबलवर ठेवलेले होते. ती खुर्चीवर येऊन बसली. पोहे छान झाले होते. पोहे खातांना तिच्या मनात परत तेच प्रश्न फिरू लागले. तिची पोहे खाण्याची इच्छा होईना. तिने तशीच प्लेट उचलून ठेवली. पाणी पिल्यानंतर तिच्या मनात विचार आला की त्याला कॉल करून थोडंसं बोलावं. तिने त्याला कॉल लावून बघितला. त्याचा नंबर बीजी येत होता. तिने परत कॉल लावला. परत बीजी. तिने वेळ बघितली. तिला जाणवलं की लवकर निघायला हवं नाहीतर उशीर होईल. ती ऑफिससाठी निघाली.


ऑफिसमध्ये आज बरंच काम होतं. ती कामात व्यस्त झाली होती. तसंच एक महत्वाची मिटिंग पण होती. तिची बॅग बाहेरच ठेऊन ती कॉन्फरेन्स रूम मध्ये गेली. नंतर मिटिंग संपल्यावर तिने मोबाईल चेक केला. त्याचे तीन मिस्ड कॉल आलेले होते. तिने कॉल करून बघितला. त्याने उचलला नाही. ती हताश झाली. परत कामामध्ये मग्न झाली.


ती संध्याकाळी ऑफिसमधून घरी आली. तो अजून आलेला नव्हता. ती त्याची वाट बघत होती. त्याचा फोन आला. तिने झटकन फोन उचलला.


तो म्हणाला, "आत्ताच ऑफिसमधून बाहेर आलो आहे. काही अर्जंट काम आहे का?"


ती म्हणाली, "नाही. अर्जंट नाही काही. घरी ये. बोलूत निवांत."


तो म्हणाला, "ठीक आहे. पोहोचतो लगेच."


तिने फोन ठेवला. तिचं ठरलं होतं. त्याच्यासोबत जाणंच योग्य ठरेल हे तिला पटलं होतं. त्याला कधी जायचं हे विचारून ती त्याप्रमाणे तिची जॉब सोडून देणार होती व त्याचं ज्या ठिकाणी ट्रान्सफर होईल तिथे जॉब शोधणार होती. तसंही दोघांनी हट्ट धरून कुठं प्रश्न सुटणार होता? त्यामुळे उलट त्यांच्यात दुरावाच येणार होता. उगाच वादविवाद होणार होते. कुणालातरी माघार घ्यावीच लागणार होती. त्यामुळे तिनेच माघार घेण्याचं ठरवलं.


तो घरी परतला होता. तो फ्रेश होऊन हॉलमध्ये आला व सोफ्यावर बसला. तेव्हा ती त्याच्या जवळ आली.


ती म्हणाली, "कधी जायचं आपल्याला ते एकदा सांगून दे. म्हणजे त्यानुसार मला जॉब सोडून आपण जातोय तेथे जॉब शोधता येईल."


तो म्हणाला, "त्याची काही गरज नाही आता. आपण कुठेही जात नाही आहोत. आपण इथेच थांबतोय. तुला तुझा जॉब सोडायची गरज नाही."


ती म्हणाली, "का? काय झालं अचानक?"


तो म्हणाला, "कंपनीची अट होती की जर प्रमोशन हवं असेल तर दुसरीकडे जावं लागेल. पण जर येथेच राहायचं असेल तर प्रमोशन होणार नाही. त्यामुळे मी प्रमोशन ला नकार दिला. कंपनीने ते प्रमोशन दुसऱ्या एका व्यक्तीला दिले. त्यामुळे आता कुठेही जायची गरज नाही."


प्रांजलीला धक्काच बसला होता. असं काही होईल याचा तिने विचारही केला नव्हता.


ती करुण स्वरात म्हणाली, "का दिलास नकार? का सोडलं प्रमोशन?"


तो म्हणाला, "तूच तर दुःखी झाली होतीस ना? मला वाटलं तुझी येथून जाण्याची इच्छा नाही. उगाच आपल्यामध्ये वाद व्हायला नकोत. त्यामुळे नकार दिला."


ती म्हणाली, "एकदा बोलायचं तरी होतं. मी रागाच्या भरात बोलले होते."


तो म्हणाला, "अगं जाऊदे ना. काय फरक पडतो? तसंही थोडीशीच पगार वाढणार होती. तू रडतेय का? शांत हो बरं."


ती म्हणाली, "माझ्यामुळेच तुझं प्रमोशन हातातून निघून गेलं. माझीच चूक आहे. मी उगाच रागात नको ते बोलून गेले. सॉरी."


तो म्हणाला, "तू शांत हो. एवढी काही मोठी गोष्ट नाहीए. जाऊदे जे झालं ते झालं."


त्याने तिला जवळ घेतलं. कधीकधी रागावर नियंत्रण न ठेवल्यास नात्यात उगाच दुरावा निर्माण होतो किंवा असं काहीतरी होऊन जातं ज्यामुळे दोघांनाही त्रास होतो. आपण आपल्याच दृष्टीकोनातून विचार केल्यामुळे प्रश्न सुटत नाहीत तर आणखीच वाढून जातात. त्यामुळे दोघांनी भांडण न करता चर्चा करुन निर्णय घेणं योग्य ठरतं.


तिला जाणवलं होतं की त्याच्या जीवनात तिचं स्थान खूप महत्वाचं होतं. त्याच्यासाठी इतर गोष्टीपेक्षा ती व त्यांचं नातं महत्वाचं होतं. त्याने उगाच थोडीच तिच्यासाठी एवढा मोठा त्याग केला होता! तिला हेही जाणवलं की तिने कदाचित थोडं संयम ठेवलं असतं तर याहीपेक्षा चांगला मार्ग मिळाला असता.


आजही आपल्या देशात अरेंज्ड मॅरेजेस भरपूर प्रमाणात केल्या जातात. बरेच तरुण आणि तरुणी अरेंज्ड मॅरेजेस ला अयोग्य समजतात. ज्या व्यक्तीला आपण नीट ओळखत पण नाहीत त्यासोबत जीवन कसं घालवणार? असे प्रश्न पण करतात.


अनोळखी असूनही ही मंडळी कसं जन्मभर नातं टिकवतात व वाढवतात? अनोळखी पासून जिवलगा पर्यंत ते कसं जातात? उत्तर सोपं आहे. मानसिकता. समोरची व्यक्ती आपल्यासारखी नाही याची कधीही तक्रार न करता जुळवून घेण्याची मानसिकता. तसेच आपल्या मनात लग्नाच्या नात्याचं असलेलं महत्व. तसेच सामंजस्याने निर्णय घेण्याची व प्रसंगी नात्यासाठी माघारही घेण्याची मानसिकता "नाही पटलं तर लग्न तोडून टाकायचं ', असा विवेकशून्य विचार न करता थोडंसं सहनशील होऊन, थोडंसं समजूतदार होऊन एकमेकांची साथ देण्याची मानसिकता.


जगात असे अनेक देश आहेत जेथे लग्न टिकतच नाहीत. तेथे लव्ह मॅरेजेस चे प्रमाण खूप जास्त आहे. प्रेमात पडून, एकमेकांना समजूनच लग्न केले जातात. तरीही लग्न तुटतात. कदाचित त्यांच्याकडे आपल्याकडील मानसिकता नसेल.


थोडक्यात बऱ्याच वेळा जिवलग अनोळखी पण होतात व अनोळखी जिवलग पण होतात. नातं कसं आहे यापेक्षा नातं कसं निभावलं जात आहे याला अधिक महत्व असतं.


समाप्त.


आवडल्यास share नक्की करा.


तसेच कथा कशी वाटली हे comment मध्ये कळवा व अश्या आणखी कथांच्या अपडेट्स साठी आमच्या fb पेज ला नक्की लाईक करा.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अरेंज मॅरेज - अनोळखी पासून जिवलगा पर्यंत ( भाग - 1 )

'खाशाबा' – मराठी सिनेसृष्टीतील आणखी एक ऐतिहासिक पर्व; नागराज मंजुळे घेऊन येत आहेत ऑलिम्पिक वीराची प्रेरणादायी कहाणी

महत्त्व