अरेंज मॅरेज - अनोळखी पासून जिवलगा पर्यंत ( भाग - 5 )

Marathi Blog


बाल्कनीमध्ये आल्यावर त्याने जड अंतःकरणाने फोन उचलला. त्याची आई त्याला फोन न उचलण्याचं कारण विचारत होती. त्याने कसंबसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला.


तो म्हणाला, "हो. ते जरा मिटिंग चालू होती. त्यामुळे."


त्या म्हणाल्या, "हो. मंग नंतर तरी करायचा होता ना कॉल."


तो म्हणाला, "नंतरही थोडा व्यस्तच होतो. आत्ताच घरी पोहोचलो. मी करणारच होतो फोन की तुझा फोन आला."


त्या पुढे म्हणाल्या, "अरे ते यात्रा एजंट चा कॉल आला होता. ते सांगत होते की पेमेंट झाली आहे. त्यांनी यात्रेबद्दल सर्व माहिती पाठवली आहे. आम्ही तयारीला लागलो आहोत."


तो अवाक झाला होता. त्याला काय होत आहे ते कळलंच नाही. पेमेंट कुणी केली? हे कसंकाय झालं?


त्याची आई म्हणाली, "तेवढंच सांगण्यासाठी केला होता कॉल. बरं ठीक आहे. ठेव. काळजी घ्या. दोघेही."


तो पण म्हणाला, "हो. तुम्हीही."


त्याने फोन ठेवला. त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. तो विचार करू लागला. पेमेंट प्रांजलीने तर केलं नसेल? पण एवढे पैसे कुठे होते? म्हणजे तिने त्यांच्या ट्रिप चे पैसे यात्रेसाठी दिले? तो मागे वळला. ती तेथेच उभी होती. गालातल्या गालात हसत होती. तो तिच्या जवळ गेला.


तो म्हणाला, "तू ट्रिप चे पैसे यात्रेसाठी दिले? "


ती म्हणाली, "हो."


तो म्हणाला, "तुझी तर खूप इच्छा होती ना?


ती म्हणाली,"हो इच्छा तर होती. पण तुझ्या इच्छेचं काय? पती-पत्नी च्या नात्यात दोघांची इच्छा महत्वाची असते ना! मला जाणवलं होतं की तू नाराज आहेस. जेवनही बरोबर जात नव्हतं तुला. दुपारी घरून फोन आल्यावर आई सांगू लागल्या की तू अजून पेमेंट केलं नाहीस आणि फोनही उचलला नाही. तेव्हा मला कळलं की तू का परेशान आहेस. अगोदर मला वाटलं की तू उगाच कंटाळा करतोय त्यामुळे मी हट्ट केला. थोडीशी रुसले. मला अगोदर माहित असतं तर मीच नकार दिला असता. तुला व घरी दुखवून माझी इच्छा पूर्ण करणं मला योग्य नाही वाटलं."


त्याचे डोळे पाणावले होते. त्याला जाणवलं की त्याने एकदा तिला सर्वकाही सांगायला हवं होतं. त्याने अगोदरच तिला गृहीत धरायला नको होतं. बऱ्याच वेळा आपणच स्वतः ला अडवून घेतो. पुढच्याचं मत जाणण्या अगोदरच.


थोडक्यात लव्ह मॅरेज असो की अरेंज असो. प्रत्येक गोष्टींत दोघांचं नेहमी एकमत होईल किंवा त्यांचे विचार नेहमीच सेम असतील असं होत नाही. झालं तरी बऱ्याच वेळा परिस्थितीमुळे देखील वाद होऊ शकतात. लव्ह मॅरेज मध्ये तरी स्वभाव वगैरे गोष्टी बघून पार्टनर निवडलेला असतो. तरीपण हल्ली लव्ह मॅरेज करुनही लग्न तुटण्याच्या घटनामध्ये वाढ होत आहे. कोणत्याही नात्यात समोरच्याची इच्छा, गरज, आवड यांना विचारात घेणं महत्वाचं असतं. समोरच्याच्या गरजा, इच्छा, आवडी या आपल्यासारख्याच असायला हव्यात ही अपेक्षा ठेवल्यामुळेच वाद होतात. एकमेकांना समजून घेणं महत्वाचं असतं.


तो खूप खुश होता. इतक्या दिवसांपासून तो उगाच चिंता करत होता. त्याने एकदा तिला सर्व सांगण्याची गरज होती फक्त. तिने किती समजूतदारपणा दाखवला होता! त्याने त्याचे दोन्ही हात तिच्याभोवती घट्ट केले. दोन अनोळखी जीव आता हळूहळू जिवलग होऊ लागले होते. एकमेकांना जाणून न घेता लग्न केल्याची किंवा समोरच्याच्या व त्यांच्या स्वभावात अंतर असल्याची तक्रार न करता ते एकमेकांना समजून घेत, समोरच्यानुसार परिस्थिती जुळवून घेत, कधी पुढाकार तर कधी माघार घेत ते त्यांचं नातं शून्यातून फुलवत होते.


त्याने बघितलं आईस्क्रीम तर वितळली होती. ती किचनमध्ये जाऊन फ्रिजमधून आईस्क्रीम घेऊन आली. तसेच दुसरी वाटी पण घेऊन आली, त्या वाटीमध्ये आईस्क्रीम काढून तिने त्याला दिली. त्याने स्वतः खाण्याअगोदर तिला भरवली. दोघेही खुश होते.


एके दिवशी प्रांजली तिचं काम आटोपून टी.व्ही बघत बसली होती. बराच वेळ टी.व्ही बघितल्यावर ती कंटाळली. तिने टी. व्ही बंद केला. नंतर तिची नजर त्या दोघांच्या फोटोवर पडली. तिने टी.व्ही च्या बाजूला असलेली ती फोटोफ्रेम हातात घेतली व ती भूतकाळात जाऊन पोहोचली.


त्या दोघांना एकांतात बोलण्यासाठी मागच्या खोलीत पाठवलं होतं. दोघेही शांत होते. तिने बघितलं त्याने ब्लॅक कलरची पॅन्ट व ब्लु कलर च शर्ट घातलं होतं. हेअर स्टाईल साधीच होती पण नीटनेटकेपणा होता. डोळ्यांवर हाफ फ्रेम चा चष्मा होता. बराच वेळ झाला तेथे शांतता होती. तो काही बोलतच नव्हता. कदाचित त्याची पहिलीच वेळ असेल, असं तिला वाटलं. तो इकडे तिकडे बघत होता. शेवटी तिनेच सुरुवात केली होती.


ती म्हणाली होती, "तुम्ही काही घेतलंच नाही."


तिने समोसा असलेली प्लेट त्याच्या हातात दिली. मंग हळूहळू संवाद सुरु झाला. किती भिन्न होते ना ते दोघे! तरीपण ते एकमेकांसोबत इतके आनंदात रहात होते.


काहीतरी पडल्याचा आवाज तिच्या कानी पडला व ती विचारांतून बाहेर आली. तिने फोटोफ्रेम जागेवर ठेवली. काय झालं हे बघण्यासाठी ती किचनमध्ये आली. किचनमध्ये कुणीच नव्हतं. तिला वाटलं की तिला भास झाला असेल. ती परत हॉलच्या दिशेने वळली. परत तिच्या कानावर आवाज पडला. नक्कीच काहीतरी होतं. तिने वळून बघितलं की आवाज बाथरूम मधून आला होता. ती हळूच बाथरूम मध्ये गेली. एक मांजर अचानक तिच्या दिशेने धावली. ती दचकली. तिचा तोल गेला. ती फरशीवर आदळली.


पुढील भाग लवकरच.


आवडल्यास share नक्की करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अरेंज मॅरेज - अनोळखी पासून जिवलगा पर्यंत ( भाग - 1 )

'खाशाबा' – मराठी सिनेसृष्टीतील आणखी एक ऐतिहासिक पर्व; नागराज मंजुळे घेऊन येत आहेत ऑलिम्पिक वीराची प्रेरणादायी कहाणी

महत्त्व